हिंजवडी:- आयटी नगरी हिंजवडी मध्ये अपघातांचे सत्र सुरूच आहे. मागील काही वर्षात अपघातांची मालिकाच सुरू आहे. त्यामुळे घराबाहेर पडल्यानंतर भीतीयुक्त वातावरण तयार झाले आहे.
कधी कुठे पुन्हा अपघात होईल सांगता येत नाही. कधी टँकर.. कधी डंपर… बस यांचे चालक सध्या हिंजवडी परिसरात ‘यमदूत’ बनून फिरत आहेत असे भयानक वातावरण निर्माण झाले आहे.
त्या विरोधात आता महिला मैदानात उतरल्या आहेत. माजी सभापती कोमल साखरे यांच्या नेतृत्वाखाली येथील महिलांनी पोलीस स्टेशनकडे धाव घेत हिंजवडी पोलिसांना निवेदन दिले यात काही उपाय योजना करण्याची मागणी या शिष्टमंडळाने केली आहे.
सोमवारी (दि. १ डिसेंबर) रोजी शिवाजी चौक येथील हिंजवडी-वाकड रस्त्यावर मद्यधुंद बसचालकाने बेजबाबदारपणे बस चालवत अनेक पादचारी आणि वाहनांना धडक दिली यात एकाच घरातील सूरज प्रसाद (६ वर्ष), आर्ची प्रसाद (९ वर्ष), प्रिया प्रसाद (१६ वर्ष) या तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
त्यामुळे परिसरात शोककळा पसरली आहे. हे कुटुंब मागील काही वर्षांपासून पंचरत्न तरुण मंडळ येथे वास्तव्यास आहे. व्यवसायानिमित्त ते येथे आले होते, त्यामुळे शाळेतून परतताना झालेल्या या घटनेने परिसरातील नागरिक संतप्त आहेत.
तसेच अपघात मालिका काही केल्या संपत नाही त्यामुळे आता यावर आवश्यक उपाय योजना करण्यात याव्यात यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. असे माजी सरपंच रोहिणी साखरे म्हणाल्या. मुळशी पंचायत समितीच्या माजी सभापती कोमल साखरे म्हणाल्या,
अवजड वाहनांवर कठोर नियम लावण्यात यावेत. शाळा सुरू होत असताना आणि सुटल्यावर देखील अवजड वाहनांना बंदी घालण्यात यावी. अनेकदा हिंजवडी येथील शिवाजी चौक परिसरात वेगवान वाहनांची ये-सुरू असते त्यावेळी पादचाऱ्यांना रस्ता ओलांडता अडचणी निर्माण होत असतात.
या परिसरात पुढील बाजूस मोठमोठी दुकाने, मॉल्स आणि मंदिर देखील आहे. तसेच मेट्रोच्या कामामुळे हा रस्ता अतिशय अरुंद आहे.
त्यामुळे येथे कायम वर्दळ असते. परिणामी अनेकदा लहान-मोठे अपघात घडतात. त्यासाठी उपाय योजना करणे, कायमस्वरूपी वाहतूक कर्मचारी नेमणे यासारख्या प्राथमिक उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे.
या अपघातांमुळे अनेक कुटुंब उध्वस्त झाली आहेत. अनेक कुटुंबांनी आपली कमावते पुरुष गमावले आहेत. मागील काही अपघातांमध्ये तरुण मुलींचा देखील मृत्यू झाला आहे.
त्यामुळे नागरिकांच्या जीवावर उठलेल्या या वाहन चालकांवर आतातरी चाप लावण्यात येईल का? असा प्रश्न उपस्थित होत असून, त्याचे उत्तर सध्या मात्र कुणाकडेच नाही. यावर योग्य उपाययोजना करून भविष्यतील काही जीव वाचवण्यासाठी तरी पुढाकार घेतला गेला पाहिजे अशी भावना या महिलांची होती.












